महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर | वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या नियोजनाचा शुक्रवारी (ता. १२) फज्जा उडाला होता. त्यानंतर शनिवारी (ता. १३) शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी कोर्ट हॉलमधून खाली येत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.
‘मनुष्यबळ कमी आहे. लेखी पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला वारंवार न्यायालय अथवा पोलिस ठाण्यामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले. येरवडा येथे अदालतमध्ये अचानक गर्दी झाल्याने फज्जा उडाला होता. मात्र, आज शिवाजीनगर न्यायालयात ही लोक अदालत होती.
सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन यांनी त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, दंड सवलतीचा सर्वांना फायदा द्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वाहनचालकांचे चलन नोंदविले गेलेले नाही. त्यांना या योजनेचा फायदा देता येत नाही. उच्च न्यायालय अथवा सरकारकडून परवानगी मिळाली, तर ऑनलाइन दंड भरता येणार आहे. परवानगी न मिळाल्यास न्यायालयात येऊन चलन भरावे लागेल.