महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ४ सप्टेंबर – मुंबई आणि राज्यभरात वापरण्यात येणारे सॅनिटायजर्स निकृष्ठ दर्जाचे आहेत असं कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाने सांगितलं आहे. काही लोक निव्वळ नफा कमावण्यासाठी बाजारात घुसले असून त्यांची उत्पादनं दर्जेदार नसल्याचं सोसायटीला आढळलं आहे.
सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढाईत आपल्याकडे शत्रूपासून बचावासाठी असलेली ढाल म्हणजे सॅनिटायझर. कामात असताना, प्रवासात हात स्वच्छ धुण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सॅनिटायझरची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. याचाच फायदा काही कंपन्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सॅनिटायझरच्या नावाखाली बाजारात अनेक प्रॉडक्ट दिसू लागले आहेत. 99.9 टक्के व्हायरसला मारणारा, सुगंधी वास असलेला, अल्कोहोल बेस असलेला अशा नावाने अनेक सॅनिटायझर्स बाजारात उपलब्ध आहेत.
ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या कन्झूमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त सॅनिटायझर्स भेसळयुक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या भागातून हे सॅनिटायझर तपासासाठी घेण्यात आले होते.
कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचा अभ्यास काय सांगतो?
तपासणीसाठी सॅनिटायझर्सचे 122 सॅम्पल घेण्यात आले
45 सॅम्पलमध्ये भेसळ आढळून आली
5 नमुन्यांमध्ये लोकांना हानिकारक मिथेनॉल असलेलं आढळून आलं
59 सॅम्पल्स लेबलवर दाखवण्यात आलेल्या माहितीप्रमाणे होते