Ind vs Pak Asia Cup 2025 : टीम इंडियावर होणार कारवाई ? नियम काय सांगतो जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराचे धिंडवडे काढले होते, अगदी त्याच शैलीत टीम इंडियाने पाकिस्तानी क्रिकेट संघाची धुलाई केली. यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2025 मध्ये रविवारी रात्री झालेल्या गट-एच्या लीग सामन्यात भारताने पाकिस्तानवर केवळ 25 चेंडू शिल्लक ठेवून 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार (India Refusing to shake hands with Pakistani players)
विजय मिळवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी खेळाडूंशी हातही मिळवला नाही. सूर्यानं षटकार ठोकताच भारताने सामना जिंकला आणि लगेच भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंगरूमचा दरवाजा बंद करून आत प्रवेश केला. याआधी टॉसदरम्यानही सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याचे टाळले होते.

निराश पाकिस्तान रेफरीकडे धावला
पाकिस्तानचा प्रशिक्षक माईक हेसन याने सांगितले की, सामना संपल्यानंतर त्यांची टीम हस्तांदोलनाची वाट पाहत होती, पण भारताने त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळेच कर्णधार सलमान आगा सामन्यानंतर मुलाखतीलाही गैरहजर राहिला. या घटनांवरून पाकिस्तानची नाराजी सामनाधिकारी अँडी पाइक्रॉफ्टपर्यंत पोहोचली आहे. सामना संपल्यानंतर काही तासांतच पीसीबीने निवेदन जारी करून औपचारिक विरोध नोंदवला. त्यांचे म्हणणे आहे की टॉसदरम्यान हात न मिळवण्याची मागणी आधीच भारताकडून झाली होती.

काय सांगतो ICC आणि ACC चा नियम?
क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा (Sportsmanship of Cricket) भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात.

टीम इंडियावर कारवाई होणार का?
हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाई प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जाणूनबुजून प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास, त्याला खेळभावनेच्या विरुद्ध कृती मानले जाते.

भारत-पाकिस्तान सामना कसा राहिला?
सामन्याचं चित्र असं होतं की सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला वेठीस धरलं. पहिल्याच षटकात विकेट मिळाल्यानंतर पाकिस्तानचा डाव दबावाखाली गेला. सलमान आगा याच्या निर्णयाने त्यांच्या संघाची वाट लावली. भारतीय फिरकी आणि वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज टिकूच शकले नाहीत. पाकिस्तानने कसाबसा 127 धावांचा टप्पा गाठला, पण हा स्कोर भारतासमोर काहीच नव्हता. भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून सामना एकतर्फी केल्यासारखं वाटू लागलं. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी शांत डोक्याने खेळ करत लक्ष्य सहज साध्य केलं. शेवटी 15.5 षटकांतच भारताने 3 गडी गमावत विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *