महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ सप्टेंबर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. मात्र त्यांच्या कुंचल्यातून साकारल्या जाणाऱ्या ठाकरेंच्या खास शैलीतील फटकारे चार वर्षांपूर्वी शेवटचे पाहायला मिळाले होते. मात्र आता तब्बल चार वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच राज ठाकरेंमधील व्यंगचित्रकार पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यातून राजकीय भाष्य करत समोर आला आहे. तब्बल चार वर्षानंतर सार्वजनिकरित्या राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्यंगचित्रामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र तसेच अंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख जय शाह यांच्यावर टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान रविवार पार पडलेल्या सामन्यावरुन राज ठाकरेंनी शाह पिता-पुत्रावर टीका केली आहे.
नेमका हा विषय काय?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय मृत्यूमुखी पडल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणार नाही अशी भूमिका घेतलेली. मात्र काही महिन्यामध्येच भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेत सामना खेळला. हा सामना भारताने 25 चेंडू आणि सात गडी राखून जिंकला. मात्र हा सामना भारताने खेळायला नको होता असं अनेक चाहत्यांबरोबरच विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं होतं. आता हेच मत राज यांनी सामन्यानंतर व्यक्त करताना व्यंगचित्रातून अमित शाह आणि जय शाहांवर टीका केली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1339094847577415&set=a.535839717902936&type=3&ref=embed_post
व्यंगचित्रात काय?
राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये अमित शाह आणि जय शाह पहलगाममध्ये मरण पावलेल्यांना भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्याचं सांगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जय शाह मयत व्यक्तीचा हात कडून त्याला ‘अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तान हरले!’ असं सांगताना दाखवण्यात आलं असून बाजूला जय शाह हाताची घडी घालून उभे असल्याचं दिसत आहे. जय शहांचा ‘आयसीसी’ तर अमित शाहांचा ‘गृह’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यंगचित्रावर नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बाजूलाच ‘पहलगाम’ अशी पाटी दाखवण्यात आली आहे.