महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ सप्टेंबर | आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान वाद थांबण्याचं नाव घेत नाही. नुकत्याच झालेल्या हँडशेक वादानंतर आता पुन्हा एकदा या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना ठरणार आहे. पाकिस्तानने ‘करो या मरो’च्या सामन्यात यूएईवर 41 धावांनी मात करून सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर भारत आधीच दोन सामने जिंकून सुपर-4 साठी पात्र ठरला होता. त्यामुळे 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत.
करो-मरो लढत ठरली पाकिस्तानच्या बाजूने
लीग फेरीत भारताने यूएई आणि पाकिस्तान दोघांनाही धूळ चारली होती. त्यामुळे पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील अखेरचा सामना ‘करो किंवा मरो’ स्वरूपाचा ठरला. टॉस जिंकून यूएईने आधी गोलंदाजी निवडली आणि सुरुवातीला पाकिस्तानच्या फलंदाजांना तगडा धक्का दिला. वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दीकीने केवळ 9 धावांत पाकिस्तानच्या सलामीवीरांना परत पाठवलं.
मात्र, संकटात फखर जमन तटस्थ राहिला. त्याने केवळ 36 चेंडूत अर्धशतक झळकावत संघाला सावरलं. कर्णधार सलमान अली आगा यांनी 20 धावांची भर घातली. शेवटी पाकिस्तानने 146 धावांपर्यंत मजल मारली.
यूएईची चांगली सुरुवात, पण पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पलटवार
यूएईच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. राहुल चोप्राने सर्वाधिक 35 धावा केल्या. पण मधल्या फळीत पाकिस्तानी गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करून सामन्याचं पारडं झुकवलं. शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सलमान आणि अयूब यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली. अखेरीस यूएईला विजय मिळवता आला नाही आणि पाकिस्तानने सुपर-4 गाठला.
भारत-पाक सामना कधी?
सुपर-4 फेरीची सुरुवात 20 सप्टेंबरपासून होईल. 21 सप्टेंबरला ग्रुप-ए मधील भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडतील. लीग फेरीत भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सनी सहज विजय मिळवला होता. पण सुपर-4 मध्ये पाकिस्तान पूर्ण तयारीनिशी उतरेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना खऱ्या अर्थाने ‘महासंग्राम’ ठरण्याची शक्यता आहे.