महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ सप्टेंबर | मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस जणू काही नोकरीचे तास भरावेत असा संध्याकाळच्या सत्रात हजेरी लावताना दिसत आहे, रात्री तो मनमुराद बरसत आहे तर सकाळच्या वेळी मात्र नोकरदार वर्गाची वाट मोकळी करून देत आहे. तर राज्याच्या इतर काही भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरुपातील सरींची हजेरी कायम आहे. त्यामुळं या परतीच्या पावसाचा काही नेम नाही असं म्हणायला हरकत नाही.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनुसार ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हजेरी लावणार आहे. तर, कोकण किनारपट्टी क्षेत्रापासून गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला पाऊस परतीच्या वाटेवर असला करीही हा परतीटचा प्रवास अगदी दणक्यात सुरू झाला असल्यानं राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह या पाऊसधारा झोडपणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa , North Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 17, 2025
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची तीव्रता कायम राहणार असून, प्रामुख्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्राला हा पाऊस झोडपणार आहे, तर विदर्भातही वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. कोकणात प्रामुख्यानं रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्हांमध्ये पावसाचं पूर्वानुमान असून, मध्य महाराष्ट्रात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोलीतही पावसाची जोरदार हजेरी असेल. तिथं विदर्भात अमरातवीपासून चंद्रपूर, नागपूर, वाशिम जिल्ह्यांमध्येही पाऊस हजेरी देऊन जाणार आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं धरणं भरली असून, त्या कारणानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नदीकाठच्या कैक गावांना पुराता धोका निर्माण झाला आहे. तर अतिवृष्टीच्या माऱ्यानं शेतात बहरलेल्या पिकांचा चिखल झाला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तिथं येवल्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं पावसामुळे सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे इथं अनेक भागात पाणीच पाणी झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं आहे.