Pimpri Heavy Rain: परतीच्या पावसाने शहराला झोडपले; ढगफुटीसदृश पावसाने रस्ते जलमय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | पिंपरी-चिंचवड शहराला गुरुवारी (दि. 18) परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. सायंकाळी पाचनंतर आलेल्या पावसाने थोड्याच वेळात रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. ढगफुटीसदृश पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वाहनचालकांची कसरत
गुरुवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले होते. सुरुवातीला रिमझिम आणि नंतर अचानक जोराचा पाऊस आल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. (Latest Pimpari chinchwad News)

थोड्याच कालावधीत मुसळधार पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. यातून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागली. आधीच रस्त्यावर असलेल्या खड्ड्‌‍यांमुळे चालकांना पाण्यातून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागले.

वाहने पडली बंद
मोशी लक्ष्मी चौकात रस्त्यावर पाणी साचल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. जाधववाडी सीएनजी पंपाजवळ येथे टपरीवर झाड उन्मळून पडले होते. यशवंतनगर चौक रस्त्यावर पाणी साचले होते. पिंपरी एमआयडीसी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दुचाकी अडकून पडल्या होत्या. पावसाचा जोर जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागला.

वल्लभनगर येथे पडले झाड
शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, मोशी, चिखली, चऱ्होली, जाधववाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पिंपरी वल्लभनगर येथे झाड पडले. दरम्यान, आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. उकाडाही जाणवत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी कामावरून परतणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसाने गाठले. आडोसा शोधेपर्यंत नागरिकांना पावसाने आलेचिंब केले. नेहमी पडणाऱ्या जोरदार पावसाच्या तुलनेत जास्त पावसामुळे नागरिकांना अडकून पडावे लागले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *