महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० सप्टेंबर | पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन दिल्यानंतरही प्रशासन अडचणीत सापडले आहे. महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई सुरू झाली आहे. नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून या कामाची सुरुवात झाली असून, शहरातील तब्बल ५५० किलोमीटर रस्ते खोदले जाणार आहेत. एकूण १६०० किलोमीटर खोदाईच्या प्रकल्पात पुणे शहरासह ग्रामीण भाग व पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. हा प्रकल्प गृह विभागाने मंजूर केला असून सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविणे गरजेचे मानले जात आहे. मात्र, महापालिकेच्या नियमानुसार पावसाळ्यात खोदाईस बंदी असतानाही अशा कामांमुळे खड्डेमुक्त पुणे प्रत्यक्षात शक्य होणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.