महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ सप्टेंबर | गोव्यात फिरण्यासाठी बहुतांश लोक बाईक किंवा स्कूटीचा वापर करतात. हा अनुभव अनेक पर्यटकांसाठी खास ठरतो. दरम्यान, हाच अनुभव आता पर्यटकांना अलिबागमध्येही घेता येणार आहे. अलिबागमध्ये बाईकमध्ये फिरता येणार आहे. अलिबागमध्ये बाईकवर फिरणे अधिक सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक रेंटल सेवेला अधिकृत परवाना दिला आहे. यामुळे पर्यटक आता बाईक किंवा स्कूटी भाड्यानं घेऊन अलिबाग फिरू शकतील.
परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात राज्य परिवहन प्राधिकरणाने रेंट ए मोटारसायकल स्कीम १९९७ अंतर्गत २ ऑपरेटर कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. हा परवाना ५ वर्षांसाठी वैध असून, त्याचे वार्षिक शुल्क १००० रूपये आहे.
या योजनेनुसार, पर्यटक आणि स्थानिक आता तासभर किंवा दिवसासाठी बाईक आणि स्कूटर भाड्यानं घेऊ शकतात. परवानाधारक ऑपरेटर सरकारचे सर्व नियम आणि सुरक्षा मानके पूर्ण करत असल्याची खात्री केली जाणार आहे.
पर्यटन आणि रोजगाराला चालना
या निर्णयामुळे अलिबागच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यासह स्थानिकांसाठीही उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोतही निर्माण होईल. यापूर्वी काही हॉटेल्स किंवा व्यक्तींकडून बेकायदेशीर बाईक भाड्यानं देण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता पर्यटक परवानाधारक ऑपरेटरकडून अधिकृतपणे बाईक किंवा स्कूटी भाड्यानं घेऊ शकतील.