महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | पुणे – शहरातील लहान मोठ्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, रस्ते असमान पातळीत असल्याने वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे. याविरोधात नागरिक तक्रार करतातच, पण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार केली. पुण्यातील रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा अशी सूचना केल्याने पथ विभागातही खळबळ उडाली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडू नयेत यासाठी महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण केले जाते. गल्लीबोळात रिसरफेसिंग करून किंवा छोटे पॅचवर्क करून खड्डे बुजविले जातात. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत असा दावा प्रशासनातर्फे केला जातो. पण जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसाने खड्डे पडण्यास सुरुवात झाली.
रस्त्याची चाळण होऊन रस्त्यावर खडी पसरते, वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यानंतर प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्याची माहीत हाती घेण्यात आले. ज्या ठिकाणचे खड्डे बुजविले पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडल्याचेही चित्र शहरात दिसते.
शहरातील खड्डे बुजविल्याचा गती वाढावा यासाठी नागरिकांना तक्रारी करता याव्या यासाठी ‘रोड मित्र ॲप’ उपलब्ध केले आहे. त्यातून आत्तापर्यंत शेकडो खड्डे बुजविले गेले आहेत. मात्र, ज्या ठिकाणची तक्रार आली तेथीलच खड्डे बुजविले जात आहेत. अन्य ठिकाणी खड्डे दिसले तरी ते बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तसेच पावसाळ्यात खडी भिजल्याने महापालिकेचा येरवड्यातील हॉटमिक्स प्लांट बंद ठेवावा लागत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी माल उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जाते. त्याचा फटकाही नागरिकांना बसत आहे.
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यासह अन्य व्हीआयपी व्यक्तींचे शहरात कार्यक्रम असतील तर त्या भागातील खड्डे बुजविणे जातात. रस्त्यांचे डांबरीकरण केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस दौरे असतात. ते शहराच्या विविध भागात कार्यक्रमासाठी जाताना तेथील खड्डे बुजविणे, अतिक्रमण काढणे अशी कार्यवाही प्रशासनाकडून केली जाते.
पण प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले असताना सर्वच ठिकाणचे खड्डे बुजविण्यात प्रशासनाला यश येत नाही. गेल्या आठवड्यात फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी खराब रस्त्यांची थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करून या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
थेट मुख्यमंत्र्यांनीच शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तक्रार केलेला रस्ता हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ने पथ विभागाच्या अधिकाऱ्यांचे, अभियंत्यांचे धाबेदणाणले आहेत.
अन्य लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांसह छोट्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पण शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख राजकीय पदाधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात, त्याविरोधात तक्रारी करत नाही, विरोधकांकडून आंदोलनही केले जात नाही अशी स्थिती असल्याने प्रशासनाला अभय मिळते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांची तक्रार केल्याने आता तरी रस्ते सुधारणार का? याकडे लक्ष लागले आहे.