पावसाचा मारा ; गरज असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात वादळी पावसाचा इशारा देत मंगळवारी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | पावसानं परतीचा प्रवास सुरू केला असला तरीही देशातून माघार घेणारा हाच पाऊस सध्या महाराष्ट्रात मात्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यावर असणारं हे अस्मानी संकट पाहता हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करत नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 – 50 किमी इतका असेल असं म्हणत नागरिकांना सावधही करण्यात आलं आहे. तर, दक्षिण कोकणापासून गोव्यातही विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. उत्तर कोकणामध्ये मात्र मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असल्या कारणानं याचा मोठा फटका मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात बसला असून, हा धोका अद्यापही टळला नाही. पुढील काही दिवस तरी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असेल असं केंद्रीय हवामान विभागाकडून (IMD) स्पष्ट करण्यात आल्यानं चिंतेत भर पडली आहे.

प्रामुख्यानं पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून आयएमडीच्या माहितीनुसार पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार मंगळवार- बुधवारी प्रामुख्यानं मराठवाड्यात नांदेड वगळता सर्व सातही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसेल. तर, विदर्भाततही पावसाचा जोर वाढणार असून, इथं गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा मारा पश्चिम महाराष्ट्रालाही सोसावा लागत असून यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात एकंदर पर्जन्यमान पाहता नागरिकांनी यादरम्यान सतर्क राहावं असाच इशारा प्रशासनानंही दारी केला आहे.

पावसाचा मारा, शेतकरी बेजार!
विदर्भात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे, तर काही ठिकाणी शेतंच्या शेतं पुराच्या पाण्याखाली आली आहे. रस्ते, पूलही पुराच्या पाण्याखाली आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *