महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १३ फेब्रुवारी २०२६ || आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया अखेर १७ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना निर्णयाद्वारे प्रक्रियेस मान्यता दिली असली, तरी अधिकृत आदेशात तारखेचा स्पष्ट उल्लेख नाही. यंदा प्रती विद्यार्थी १७,६७० रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार असल्याचे शासनाने निश्चित केले आहे. दोन महिन्यांच्या विलंबानंतर ही प्रक्रिया सुरू होत असल्याने पालक आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. अखेर प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अर्ज करताना विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिघातील शाळाच निवडता येणार आहे. ‘गुगल लँडमार्क’वर दर्शविलेल्या अंतरानुसारच अर्ज प्रणाली स्वीकारेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दूरच्या शाळांना प्राधान्य देण्याचा पर्याय यंदा उपलब्ध नसणार आहे. या बदलामुळे स्थानिक पातळीवरच्या शाळांनाच प्राधान्य मिळणार असले, तरी काही पालकांसाठी पर्याय मर्यादित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विनाकारण प्रवेश नाकारल्यास संबंधित शाळांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारी योग्य ठरल्यास दोषी शाळांवर दंड आकारला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले असून, १७ फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. आता अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
