England squad Ashes Series 2025 : प्रतिष्ठयेच्या ॲशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा ! जॅक्स-पॉट्सचा समावेश, वोक्सला वगळले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २५ सप्टेंबर | इंग्लंडने अगामी ॲशेस मालिकेसाठी 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर, न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. ॲशेस मालिकेची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथील कसोटी सामन्याने होणार आहे. या मालिकेय 5 कसोटी सामने खेळले जाणार असून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.

स्टोक्स कर्णधारपदी, दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंचे पुनरागमन
खांद्याच्या दुखापतीतून सावरत असलेला बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार असेल. तसेच मॅथ्यू पॉट्स आणि विल जॅक्स यांनी संघात स्थान मिळवले आहे. जॅक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती, परंतु तो ॲशेससाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

ड्युरहॅमचा वेगवान गोलंदाज पॉट्सने डिसेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, तर सरेचा जॅक्स डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. यंदाच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पॉट्सने 10 सामन्यांत 28 बळी घेतले आहेत. 84 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. जॅक्सने तीन डावांत 136 धावाही केल्या आहेत.

हॅरी ब्रूक उपकर्णधार
हॅरी ब्रूकची ॲशेस मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने ऑली पोपची जागा घेतली आहे. मार्क वूडने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन केले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत बोटाला दुखापत झालेल्या शोएब बशीरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बशीरला लॉर्ड्स कसोटीत बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला भारताविरुद्धची मालिका अर्धवट सोडावी लागली होती.

स्टोक्सव्यतिरिक्त, संघात जो रूट, झॅक क्रॉली, बेन डकेट आणि पोप यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी जेमी स्मिथ सांभाळणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान पुनरागमन केलेला जोफ्रा आर्चर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत ब्रायडन कार्स, गस ॲटकिन्सन, जोश टोंग, वूड आणि पॉट्स यांचा वेगवान गोलंदाजीच्या फळीत समावेश आहे. बशीर हा संघाचा मुख्य फिरकीपटू असून, रूट, जेकब बेथेल आणि जॅक्स यांच्याकडेही फिरकीचे पर्याय उपलब्ध आहेत.

वोक्सला वगळले
दरम्यान, भारताविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या कसोटीदरम्यान खांद्याची दुखापत झालेल्या ख्रिस वोक्सला ॲशेससाठी निवडण्यात आलेले नाही. 36 वर्षीय वोक्सने दुखापतीकडे दुर्लक्ष करत, हाताला दुखापत होऊनही अंतिम दिवशी फलंदाजी केली होती.

इंग्लंडचा ॲशेस मालिकेसाठीचा संघ
झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, जोश टोंग, मार्क वूड, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, शोएब बशीर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *