करोना बरा होतो, नात्यातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं जनतेला आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ सप्टेंबर – करोनाच्या भीतीमुळे नात्यांवर परिणाम होत आहे. करोनामुळे आई-मुलाचे नातेही दुरावल्यासारखे झाले आहे. मात्र करोनामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. करोनाची भीती बाळगू नका व कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. नात्यातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

‘लोक भीतीपोटी खूप चुका करतात. पनवेलमधील घटनेचे उदाहरण देईल, ज्यामध्ये आई असिम्प्टोमॅटीक होती, ती बरी झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटले आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी वाळीत टाकल्याप्रमाणे वागू नका’, असे ते म्हणाले.

राज्यात आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांमध्ये किमान ५००० रुग्ण असे आहेत ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० लोक बरे झाले आहेत. करोनाबाधित रुग्ण १०-१२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. संसर्गाचे प्रमाण जास्त हा करोना विषाणूचा मुख्य गुणधर्म आहे. परंतु याची जागतिक टक्केवारी पाहिली तर ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टेमॅटीक आहेत. कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस करोना काळजी केंद्रात राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावे वाटत नाही. उर्वरित काही २-३ टक्के रुग्ण गंभीर असतात, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *