महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या शेवटच्या लढतीत श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजयाची नोंद केली. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाचा चांगला सराव कालच्या लढतीत झाला. पण, त्याचवेळी हार्दिक पांड्या व अभिषेक शर्मा यांच्या दुखापतीचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. ही दोघं पाकिस्तानविरुद्धच्या फायनलला मुकण्याची चर्चा सुरू झाली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिले षटक टाकल्यानंतर हार्दिक पांड्याने मैदान सोडले. त्याने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसला बाद केले, परंतु त्यानंतर त्याच्या डाव्या पायात हॅमस्ट्रींग समस्या जाणवू लागली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर तो संपूर्ण सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी आलाच नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक दिवस शिल्लक असताना हार्दिकचे असे मैदान सोडून जाणे चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
‘हार्दिकच्या पायात क्रॅम्प आला आहे आणि त्याच्यावर आज आणि उद्या सकाळी उपचार केले जातील. त्यानंतर आम्ही काय तो निर्णय घेऊ,’असे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचवेळी भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माही श्रीलंकेच्या संपूर्ण डावातील दुसऱ्या टप्प्यात डग आऊटमध्ये बसून होता. डावाच्या ९व्या षटकात त्याला वेदना होत असल्याच्या जाणवल्या आणि धावताना त्याच्या उजव्या मांडीत दुखापत झाली. त्यानंतर १०व्या षटकात त्याने मैदान सोडले. हार्दिकप्रमाणे अभिषेकलाहा आईस पॅक उपचार दिले गेले. तो पूर्णपणे बरा असल्याचे मॉर्केलने सांगितले.
या सामन्यात रिंकू सिंग, शिवम दुबे आणि जितेश शर्मा हे वेगवेगळ्या टप्प्यात राखीव खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना दिसले. तिलक वर्मानेही मैदान सोडले होते, परंतु काही कालावधीनंतर तो परतला. मॉर्केल म्हणाला, मुलांना विश्रांतीची गरज होती. त्यांनी आईस बाथ घेतला आहे आणि रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली आहे.