महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | पीएमपीने नुकतीच पुण्यातील चार मार्गांवर डबलडेकर बसची ट्रायल रन घेतली. ती यशस्वी झाली असून, आता आणखी दहा डबलडेकर बस पुण्यात आणण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाचे आहे. मात्र, या बस आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाला संचालक मंडळाची मान्यता घेणे महत्त्वाचे असणार आहे. त्याकरिता पीएमपीकडून याबाबतची पूर्वतयारी सुरू असून, आगामी संचालक मंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
पीएमपीच्या संचालक मंडळावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, सीआयआरटीचे संचालक, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि निवडून आलेले नगरसेवक (लोकप्रतिनिधी) असतात. सध्या लोकप्रतिनिधी नसले तरी दोन्ही मनपा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, सीआयआरटीचे संचालक, पुणे आरटीओ हे पीएमपीच्या संचालक मंडळावर आहेत.
या पीएमपीच्या संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यावरच पुण्यात आणखी दहा बस आणण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत दहा डबल डेकर बस आणण्यास मंजुरी मिळावी, याकरिताचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. पीएमपीच्या संचालकांनी मान्यता दिल्यावरच या दहा बस पुण्यात येण्याचे भवितव्य अंतिम ठरणार आहे. मात्र, असे असले तरी पुण्यात नुकतीच चार मार्गांवर घेण्यात आलेली ट्रायल रन यशस्वी झाल्याचे समोर आले आहे.
बैठकीत मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार; दहा बससाठी लागणार 20 कोटी रुपये
पीएमपीने नुकतीच ट्रायल रन घेतलेल्या डबलडेकर बसची किंमत सुमारे दोन कोटी इतकी आहे. जर एकूण दहा बस आणण्याचे ठरले तर साधारण: 20 कोटी रुपये पीएमपीला या बस खरेदीसाठी मोजावे लागणार आहेत. मात्र, या बस भाडेतत्त्वावर घेण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. त्यामुळे या बस खरेदीचा खर्च डायरेक्ट पीएमपीवर पडणार नसल्याचेही चित्र स्पष्ट दिसत आहे.
नुकतीच डबलडेकरची पुण्यातील चार महत्त्वाच्या मार्गावर टायल रन यशस्वी झाली आहे. प्रवाशांना बसमध्ये बसवून सुद्धा या बसची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. आता आणखी दहा डबलडेकर बस प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्यात आणण्याचे पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे साहेब यांचे नियोजन आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्याकडून ठेवण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर दहा डबलडेकर बस पुण्यात प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जातील.
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल