महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ सप्टेंबर | भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलीय. मोबाईलमध्ये 5जी नेटवर्क आल्यापासून मोबाईल वापरण्याचा आनंद द्विगुणित झालाय. पण यासोबतच यूजर्सना मोबाईल बॅटरी लवकर संपण्याचा त्रास सुरु झाल्याचे अनुभवही येऊ लागलाय. 5 जी नेटवर्क तुमच्या मोबाईलवर कसा परिणाम करतंय? यातून कसं वाचायचं? सविस्तर जाणून घेऊया.
5जी चिपसेटमुळे जास्त बॅटरी वापर
5जी नेटवर्क 4जीपेक्षा जास्त बॅटरी खर्च करते. 2020-21 मधील अनेक फोन्समधील 5जी चिपसेट पूर्णपणे ऑप्टिमाइझ नव्हते. 2022-23 मधील काही चिपसेट 5जी नेटवर्कवर गरम होतात. ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. टेलिकॉम क्षेत्रातील अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. 5जीचा हाय-स्पीड डेटा प्रोसेसिंगसाठी जास्त शक्ती लागते, ज्याचा थेट परिणाम बॅटरीवर होत असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
नेटवर्क स्विचिंगची समस्या
भारतात 5जी नेटवर्क अजून पूर्णपणे स्थिर नाही. अनेक ठिकाणी फोन 5जीवरून 4जीवर स्विच होत राहतो, विशेषतः सिग्नल कमकुवत असल्यास असे वारंवार होतो. या सततच्या स्विचिंगमुळे बॅटरीचा वापर वाढतो. कमकुवत सिग्नलच्या वेळी फोन सिग्नल शोधण्यासाठी अतिरिक्त मेहनत घेतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपत असल्याचेही रिपोर्ट सांगतो.
सॉफ्टवेअरची भूमिका
फोनचे सॉफ्टवेअर बॅटरीच्या वापरावर परिणाम करते. चांगले ऑप्टिमाइझ केलेले सॉफ्टवेअर 5जीचा वीज वापर कमी करू शकते. उदाहरणार्थ, अॅपलने नुकतेच नवीन 5जी मॉडेम लाँच केले. जे बॅटरी बचतीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे बॅटरी लाईफ वाढल्याचे दिसून येते.
हाय-रिझोल्यूशन डिस्प्लेचा परिणाम
5जीवर अल्ट्रा-हाय डेफिन व्हिडिओ स्ट्रीमिंग केल्यास बॅटरी जलद संपते. कारण हाय-रिझोल्यूशन डिस्प्ले जास्त शक्ती खेचतो. 720p किंवा 1080p मध्ये स्ट्रीमिंग केल्यास बॅटरीचा वापर कमी होतो, ज्यामुळे चार्जिंगची गरज कमी पडत असल्याचे दिसून येते.
काय कराल?
5जी वापरताना बॅटरी वाचवण्यासाठी सिग्नल मजबूत असलेल्या ठिकाणी फोन वापरा. अनावश्यक हाय-रिझोल्यूशन स्ट्रीमिंग टाळा आणि सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा. 5जीचा वेग आनंददायी आहे, पण बॅटरी वाचवण्यासाठी तुम्हाला वरील सावधगिरी बाळगावी लागेल.