Asia Cup 2025 : पाकिस्तानच्या कर्णधाराचा खळबळजनक दावा ; ‘सूर्या एकट्यात हात मिळवतो पण ….’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात आशिया कपचा सामना पार पडला, ज्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवला. भारत पाकिस्तान संघ यंदाच्या स्पर्धेत तब्बल तीन वेळा समोरासमोर आले. तिन्ही वेळेला भारताने त्यांचा लाजिरवाणा पराभव केला. एवढंच नाही तर तिन्ही वेळेला टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवला नाही. आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) हात न मिळवण्याच्या भारतीय संघाच्या धोरणाला पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने खेळाचा अनादर करणारे म्हटले. सलमानने असेही म्हटले की, क्रिकेटपटूंना आदर्श मानणाऱ्या तरुण चाहत्यांमध्ये यामुळे खेळाडूवृत्तीचे चांगले उदाहरण निर्माण होणार नाही.

भारताने क्रिकेटचा अनादर केला :
भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये रविवारी पाकिस्तानला पाच विकेटने हरवले आणि विजेतेपद पटकावलं. पाकिस्तानी कर्णधाराने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘स्पर्धेत भारताने जे केले ते खरोखरच निराशाजनक होते. हस्तांदोलन न करून त्यांनी केवळ आपलाच नव्हे तर क्रिकेटचाही अनादर केला. चांगले संघ असे करत नाहीत जे त्यांनी केलं. आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायची होती म्हणून आम्ही स्वतः ट्रॉफी घेऊन फोटोशूटला गेलो. आम्ही तिथे उभे राहून आमचे पदके स्वीकारली. मला कठोर शब्द वापरायचे नाहीत, पण त्याचे वर्तन खूपच अपमानजनक होते’.

सूर्यकुमार यादव खाजगीत हात मिळवतो :
कर्णधार सलमान आगाने दावा केला की, ‘सूर्यकुमारचे सार्वजनिक आणि खाजगी वर्तन वेगळे होते’. तो म्हणाला, ‘स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आणि स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्याने माझ्यासोबत हात मिळवला होता. यानंतर, रेफरी च्या सुनावणीदरम्यानही त्याने हात मिळवला, पण जगासमोर आणि कॅमेऱ्यांसमोर, ते हात मिळवत नाहीत. मला खात्री आहे की तो दिलेल्या सूचनांचे पालन करत आहे, पण जर त्याला निर्णय घ्यायचा असता तर त्याने हात मिळवला असता’.

भारताला ट्रॉफी न देण्याचं केलं समर्थन :
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पारितोषिक समारंभाच्या व्यासपीठावर उभे राहून ट्रॉफी घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना सलमानने म्हटले की, ‘भारताला पीसीबी प्रमुखांकडून ट्रॉफी घ्यायची नव्हती म्हणून त्यांना ती देण्यात आली नाही’. तो म्हणाला की, ‘आज जे काही घडले ते मागील सर्व घटनांचे परिणाम होते. एसीसी अध्यक्ष विजेत्याला ट्रॉफी देतात. जर तुम्हाला त्याच्याकडून ती स्वीकारायची नसेल तर तुम्हाला ती कशी मिळेल? मी पहिल्यांदाच असे काही पाहिले आहे. स्पर्धेदरम्यान जे घडले ते खूप वाईट होते. मला आशा आहे की हे लवकरच थांबेल, कारण ते क्रिकेटसाठी चांगले नाही’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *