महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | सोने आणि चांदी दर आज (29 सप्टेंबर) नव्या उच्चांकावर पोहोचले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 2,192 रुपयांनी वाढून 1,15,454 झाला आहे. यापूर्वी तो 1,13,262 होता. त्याचप्रमाणे, चांदीचा भाव देखील 6,287 रुपयांनी वाढून प्रति किलो 1,44,387 वर पोहोचला आहे. यापूर्वी तो प्रति किलाे 1,38,100 रुपये होता.
या वर्षात सोने 39,000, तर चांदी 58,000 रुपयांनी महाग
या वर्षात सोन्याच्या दरात सुमारे 39,292 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 76,162 होता, आता तो 1,15,454 झाला आहे. याच काळात चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी चांदीची प्रति किलो किंमत 86,017 रुपये होती. ती आता 1,44,387 प्रति किलो झाली आहे.
चांदीच्या किमतीत यावर्षी मोठी वाढ
या वर्षी चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, १ जानेवारी २०२५ रोजी ९३,५०० रुपये प्रति किलो असलेला शुद्ध चांदीचा (९९९ शुद्धता) भाव २७ सप्टेंबर २०२५ रोजी १,४१,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात होती. मात्र आज चांदीच्या बाजारपेठेत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ४८,४०० रुपयांची वाढ झाली आहे, जी टक्केवारीनुसार सुमारे ३४% आहे.
काय आहेत चांदीचे दर वाढीमागील कारणे?
औद्योगिक मागणीत वाढ : चांदीचा वापर दागिन्यांसह सौर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रिक वहनांचे सुटे भाग इत्यादींमध्येही होतो. हरित ऊर्जा, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची मागणी वाढत असल्याने चांदीची मागणीही वाढली आहे.
पुरवठ्याची कमतरता : अनेक रिपोर्टनुसार, , मागणीच्या तुलनेत चांदीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे चांदीचे उत्पादन (खाणकाम आणि शुद्धीकरण) मागणीनुसार होत नाहीये.
रुपयाचे अवमूल्यन : भारतात मोठ्या प्रमाणावर चांदीची आयात होते. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होतो, तेव्हा आयात महाग होते, ज्यामुळे देशांतर्गत किमती वाढतात.
महागाई आणि गुंतवणुकीच्या पर्यायांची कमतरता : महागाई, आर्थिक मंदी आणि गुंतवणुकीचे इतर पर्याय आकर्षक वाटत नाहीत, तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीसारख्या धातूंना प्राधान्य देतात. यामुळे चांदीची गुंतवणूक मागणी वाढते.
सणासुदीची मागणी : भारतातील सण-उत्सव आणि लग्नसमारंभांमध्ये चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दागिने, नाणी आणि चांदीची भांडी यांची मागणीही दर वाढण्यास कारणीभूत ठरते.