महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | भीमा आणि नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपार पासून भीमानदी पात्रात तब्बल एक लाख 25 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.
दोन दिवसांपासून भीमेसह नीरा नदी खोर्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रणीत ठेवण्यासाठी सोमवारी उजनीतून भीमा नदी पात्रात एक लाख 25 क्युसेक इतका विसर्ग सुरू केला आहे.
माळशिरस तालुक्यातील संगम येथून पुढे भीमानदीमध्ये एकूण विसर्ग 1 लाख 34 हजार 437 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. सायंकाळी पाच वाजता पंढरपुरात 1लाख 5 हजार 708 क्युसेक इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित झाली आहे.
पंढरपूर मध्ये भीमा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे नदीकाठच्या सखल भागातील व्यास नारायण व अंबाबाई झोपडपट्टीतील काही पत्र्याच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. उजनी आणि वीर धरणाच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसानंतर दोन्ही धरणातून पाणी भीमा आणि नीरा नदीमध्ये सोडले आहे. भीमा नदीत एक लाख 25 हजार क्युसेक तर वीर धरणातून आठ हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मे महिन्यापासून सहाव्यांदा पंढरपूर मध्ये भीमा नदी धोकादायक पध्दतीने वाहताना दिसते. नदी काठावर असणारे घाट पाण्यात बुडाले आहे.