महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | सेवाभाव समर्पण आणि मानवतेच्या दिव्य उत्सवाचे स्वरूप होऊ घातलेल्या ७८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या ग्राउंड सेवांचा शुभारंभ रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सदगुरू माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन शुभहस्ते निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे करण्यात आला. हा संत समागम ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान आयोजित होणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांची सुरुवात एका अत्यंत भावपूर्ण क्षणाने झाली. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी या दिव्य जोडीच्या शुभहस्ते या सेवांचे उद्घाटन करण्यात आले. हे दृश्य केवळ एक परंपरा जतन करणारे नव्हते, तर सेवा, श्रद्धा आणि मानवता यांच्या प्रति खोलवर आस्था असल्याचे जिवंत प्रतिबिंब ठरले. या शुभप्रसंगी मिशनची कार्यकारिणी समिती, केंद्रीय सेवादल अधिकारी तसेच हजारो भाविक भक्तगण सेवाभावनेने तन्मय होऊन उपस्थित होते.
या भव्य दिव्य आयोजनाच्या पूर्वतयारीच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण देशातीलच नव्हे तर पुणे व महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने सेवादल स्वयंसेवक व अन्य सेवादार भक्त समालखा (हरियाणा) स्थित निरंकारी आध्यात्मिक स्थळाकडे रवाना झाले आहेत.
या विविधतेने भरलेल्या जगामध्ये एका बाजूला मानव मात्र भाषा, संस्कृती, जातीपाती आणि धर्माच्या नावाखाली विभाजित झालेले दिसत आहेत तिथे दुसऱ्या बाजुला एक शाश्वत सत्य आपणां सर्वांना एका अतूट सूत्रामध्ये गुंफते आहे. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकर आहोत जो ईश्वर वेळोवेळी अनेक रूपामध्ये साकार होऊन प्रेम, करुणा, समानता आणि मानवतेचा दिव्य संदेश देत आला आहे. आमची वेगवेगळी रूपं वेगवेगळे राहणीमान असूनही आमच्यामध्ये तीच एकसारखी चेतना, जीवनशक्ती प्रवाहित होत आहे. तीच आम्हाला एकमेकांशी जोडण्याचे कार्य करत आहे. हीच भावना आत्मसात करून संत निरंकारी मिशन मागील ९६ वर्षापासून ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘अवघे विश्व एक परिवार’ ही दिव्य भावना जिवंत करत आहे. निरंकारी मिशन केवळ प्रेम, शांती आणि समरसता यांचा पावन संदेश नसून सत्संग सेवा आणि विशाल संत समागमांच्या माध्यमातून तो कृतीत उतरवत आहे.
सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे हार्दिक अभिनंदन संत निरंकारी मंडळाच्या प्रधान आदरणीय राजकुमारी तसेच संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखिजाजी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आणि शुभाशीर्वादांची कामना केली.
समागम सेवेच्या शुभारंभ प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित दर्शनाभिलाषी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले, की आज समागम सेवांच्या पावन प्रसंगी उपस्थित राहताना अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये जो उत्साह आहे, त्याची सुंदर झलक अनुभवायला मिळत आहे. नि:संदेह सत्संग, सेवा करत प्रत्येक मन भक्तीमय होत आहे. सर्वांमध्ये या परमात्म्याचे रूप पाहायचं आहे कोणत्याही प्रकारचा अभिमान न करता सर्वांचा आदर सन्मान करत सेवा करायची आहे. निरंकार प्रभूचे ध्यान करत या परमात्म्याची जोडून राहायचे आहे.
समागम हा केवळ समूह रुपात एकत्रित होण्याचे नाव नव्हे तर तो सेवेचा एक प्रबळ भाव आहे. आपण आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून आत्ममंथन करत हे पाहायचे आहे, की आमचे जीवन खरोखरच कोणत्या दिशेने चालले आहे. परमात्मा आतही आहे आणि बाहेरही आहे. आपण स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची भिंत तयार करायची नाही, तर स्वतःच्या अंतर्मनात डोकावून मनामध्ये साठलेल्या उणीवांमध्ये सुधारणा करायची आहे.
जवळपास ६०० एकर परिसरात पसरलेले हे समारंभ स्थळ सेवा, श्रद्धा आणि मानवतेचे प्रतीक आहे. इथे लाखो भक्तांचा निवास, भोजन, आरोग्य, आवागमन आणि सुरक्षा यासारख्या सर्व व्यवस्था पूर्ण श्रद्धेने व नि:स्वार्था भावनेने केली जाते. देश विदेशातून आलेले संतजन सेवेमध्ये मग्न महात्मा आणि समाजाच्या सर्व थरांतून आलेले भाविक भक्तगण या महा उत्सवामध्ये सहभागी होऊन एकत्व, समर्पण आणि आत्मिक आनंद अनुभवतात.
यावर्षी समागमाचे शीर्षक ‘आत्ममंथन’ असे आहे. याचा अर्थ आपण आपल्या अंतरात डोकावून विचार आणि कर्मांना आत्मज्ञानाने शुद्ध करण्याची प्रेरणा होय. हा प्रवास सद्गुरुकडून प्रदत्त ब्रह्मज्ञानानेच सुरू होतो आणि आत्मिक शांती, आनंद व मोक्षाचे द्वार उघडतो.
मानवतेचा हा दिव्य उत्सव फक्त निरंकारी मिशनच्या अनुयायांनाच नव्हे तर प्रत्येक धर्म, जात, भाषेच्या देश-विदेशातील मानव प्रेमींचे खुल्या दिलाने स्वागत करतो. ही अशी भूमी आहे जिथे मानवता आध्यात्मिकता आणि सेवाभाव यांचा अनुपम संगम दृष्टिगोचर होतो. एक अशी अलौकिक अनुभूती प्रदान करतो, जी शब्दांच्या पलीकडील आहे.