महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ ऑक्टोबर | St Bus Tickit Fare Hike: राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या हंगामातच ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 20 दिवसांसाठी एसटीने 10 टक्के भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळं दिवाळीत नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. एसटीने 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात एसटीची 10 टक्के भाडेवाढ लागू केली आहे. या भाडेवाढीमुळं एसटीच्या तिजोरीत 1100 कोटीचा महसूल जमा होणार आहे.
यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी आहे. तसंच शाळांना सुट्ट्या लवकर पडत आहेत. त्यामुळं प्रवासी संख्या आधीच वाढते. त्यामुळं जादा बसगाड्या 15 ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर परतीचा प्रवास लक्षात घेऊन 5 नोव्हेंबरपर्यंत वाढीव बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं या काळासाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.
एसटीच्या या 10 टक्के भाडेवाढीमुळं लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे. मात्र वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू असणार आहे. तर भाडेवाढ सध्या विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता लागू असणार आहे.
हंगामी भाडेवाढीनंतर असे तिकीट दर
गाडीचा प्रकार सध्याचे दिवाळीत
साधी (मिडी, साधी) 10.05 पैसे 11.05 पैसे
जलद 10.05 पैसे 11.05 पैसे
निमआराम 13.65पैसे 15 रुपये
साधी शयनआसनी 13.65पैसे 15 रुपये
साधी शयनयान 14.75 पैसे 16.25 पैसे
एसी शिवशाही (आसनी) 14.20 पैसे 15.65 पैसे
एसी जनशिवनेरी (आसनी) 14.90पैसे 16.40 पैसे
एसटीला रोज 3 कोटींचा तोटा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. आता तर मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान होत असून, विशेषतः मराठवाड्यातील तडाख्याचा अधिक फटका बसल्याचे स्पष्ट सांगण्यात येते. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यामध्ये एसटी महामंडळाचे तब्बल 83 लाख 52 हजार प्रवासी कमी झाले आहेत. दैनंदिन उत्पन्न सरासरी 31 कोटी 32 लाख आहे, जे अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी झाले.