महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | RBI On Economy and Trump Tariff: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी भारताच्या विकासाच्या वाटचालीसाठी व्यापार आणि टॅरिफशी संबंधित धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूत स्थितीवर विश्वासही दर्शवला. आपल्या पतधोरणाच्या आढाव्याच्या निवेदनात, “सध्याची जागतिक अनिश्चितता आणि टॅरिफशी संबंधित घडामोडी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्तरार्धात आणि त्यानंतर विकासाची गती कमी करू शकतात,” असं म्हटलं.
संजय मल्होत्रा यांचे हे वक्तव्य अशा वेळी खूप महत्त्वाचे आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं भारतीय निर्यातीवर अमेरिकेत ५०% टॅरिफ लावला आहे. या ५०% टॅरिफपैकी २५% ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ आहेत. उर्वरित २५% अतिरिक्त टॅरिफ भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे लावलं गेलं आहे.
दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू
भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर चर्चा अजूनही सुरू आहे. परंतु काही मुद्द्यांवर अडथळे कायम आहेत. हे मुद्दे म्हणजे भारताचा रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यापार आणि अमेरिकेच्या निर्यातीसाठी भारतानं आपल्या कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांसाठी आखलेली ‘रेड लाईन’. यावर अद्याप कोणतीही सहमती होऊ शकलेली नाही.
जीएसटी कपात पुरेशी नाही
रिझर्व्ह बँकेनं बुधवारी रेपो दरात कोणताही बदल केला नाही. धोरणात्मक दर निश्चित केल्यानंतर, आरबीआय गव्हर्नर म्हणाले, “जीएसटी दरांमध्ये नुकतीच केलेली कपात ५०% अमेरिकेच्या टॅरिफचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही,”
व्यापार करारावर चर्चा सुरू आहे आणि टॅरिफ कमी होऊ शकतात, असंही ते म्हणाले. पण मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँकेनं आपली गणना भारतीय निर्यातीवर ५०% टॅरिफ दर गृहीत धरून केली आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीच्या अंदाजांमध्ये जी कपात करण्यात आली आहे, ती अमेरिकेच्या टॅरिफच्या संभाव्य प्रभावामुळे आहे.
टॅरिफचा जीडीपीवर परिणाम?
“सध्या सुरू असलेले टॅरिफ आणि व्यापार धोरणाची अनिश्चितता बाहेरील मागणीवर परिणाम करेल. दीर्घकाळ चाललेला भू-राजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारात असलेली अस्थिरता विकासाच्या दृष्टिकोनासाठी नकारात्मक धोका निर्माण करते,” असंही मल्होत्रा म्हणाले. टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीचा वेग मंदावेल, असंही म्हटलं.