महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | October Heat: ऑक्टोबर महिना उजाडला तरी अजूनही राज्यातून पावसाने माघार घेतली नाहीये. सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यासह देशभरात हाहकार माजवला. अनेक ठिकाणी पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. यंदा पावसाने आपला मुक्काम लांबवल्याने ऑक्टोबर महिन्यातही पावसाने दाणादाण उडवून दिली होती. आता हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्याचा अंदाजही वर्तवला आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, यंदा ऑक्टोबर हिटमध्ये उन्हाचे चटके जाणवणार नाही. तर या महिन्यातही सरासरीच्या तुलनेत अधिक पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यंदा राज्यभरात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
उन्हाचे चटके जाणवणारच नाहीत?
ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे उन्हाची तीव्रता जास्त असते. या महिन्यात उन्हामुळं काहिली होत असते. तापमान जास्त असल्याने ऑक्टोबर हिटचा तापही अधिक जाणवतो. मात्र यंदा नागरिकांना ऑक्टोबर हिटचा ताप सहन करावा लागणार नाही. नेहमीप्रमाणे जाणवणारे उष्णतेचे चटके यंदा ऑक्टोबरमध्ये टळणार आहेत. त्यामुळं एकीकडे नागरिकांची उन्हाच्या काहिलीपासून सुटका होणार आहे. तर, एकीकडे निसर्गाचे चक्र फिरल्याची चर्चा होताना दिसतंय.
ऑक्टोबर हिट कशामुळे?
नैऋत्य मान्सूनचा परतीच्या प्रवासात आकाश हे बहुतांश निरभ्र असते. त्यामुळे तापमानात सुमारे 30 ते 35 अंश सेल्सिअस वाढ होते. ऑक्टोबर महिन्यात माती आणि जमीन ओलसर असते. दिवसा हवामान उष्ण आणि दमट असते आणि रात्री थंड असते. परतीच्या पावसामुळे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचे चटके बसतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये सूर्यदक्षिणेकडे सरकत असतो. त्यामुळे उत्तरेकडील मैदानांवर कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो. त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवते.
8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार
दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार असून सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.