महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | पुण्यातील मेट्रोचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. पुणे मेट्रो लोहगाव येथील पुणे एअरपोर्ट आणि वेगाने विकसित होत असलेल्या कोंढवा-येवलेवाडी/उंड्री परिसराला नवीन मेट्रो कॉरिडॉरने जोडण्याची योजना आखत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान आणि गारेगार होईल. त्याचसोबत त्यांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होईल.
पुणे मेट्रोच्या या विस्तारांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महा-मेट्रोने निविदा मागवल्या होत्या. पहिल्या फेरीच्या छाननीनंतर आरवी इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लिमिटेड आणि आरआयटीईएस लिमिटेड या दोन कंपन्यांनी तांत्रिक टप्प्यात मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत या प्रोजेक्टसाठी आर्थिक बोली लावल्या जातील. सर्वात कमी रक्कम देणाऱ्या कंपनीला डीपीआर तयार करण्याचे काम मिळेल. हा अहवाल नवीन मार्गांचा नेमका मार्ग ठरवेल.
या मेट्रोसंदर्भात शेअर केले जाणारे नकाशे हे फक्त ढोबळ रेखाचित्रे आहेत. अंतिम संरेखन तपशीलवार अभ्यासानंतरच समोर येतील. जर हा प्रोजेक्ट नियोजनानुसार पुढे सरकला तर पुणेकरांना विमानतळापर्यंत प्रवास करणे अधिक सोपे होईल. त्याचसोबत कोंढवा आणि येवलेवाडीच्या वाढत्या निवासी क्षेत्रांसाठी मेट्रोची चांगली सुविधा मिळेल. या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
पुणे मेट्रो चालकविरहित रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. याची सुरूवात खडकवासला ते खराडी या प्रस्तावित मार्गापासून होईल असे देखील सांगितले जात आहे. महा-मेट्रोचे सिस्टीम्स अँड ऑपरेशन्स संचालक विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, पुणे मेट्रो लाईन-४ च्या मंजूर झालेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार मेट्रो लाईन्स अटेंडेड ट्रेन ऑपरेशन (एटीओ) मोडमध्ये चालवल्या जाणार आहेत ज्यामध्ये ट्रेन ऑपरेटर प्रत्येक ट्रेनमध्ये उपस्थित राहून एटीओ-आधारित कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोलच्या कामकाजाचे देखरेख करतील.’