महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटविषयी केलेली टिप्पणी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कोर्टाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की क्रिकेट आता फक्त एक बिझनेस राहिला आहे, त्यात खेळाची भावना उरलेली नाही. कोर्टाने यापुढे कोणत्याही खेळासंदर्भातील वादात हस्तक्षेप न करण्याचा विचार मांडला आहे. जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर जबलपूर विभागातील एका क्रिकेट असोसिएशनशी संबंधित प्रकरणावर सुनावणी सुरू होती. या दरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी टिप्पणी करताना म्हटलं, “क्रिकेटमध्ये आता खेळासारखं काही उरलेलं नाही, हे फक्त बिझनेस बनलं आहे आणि हीच आजची मोठी वास्तवता आहे.”
क्रिकेटचं वेड
सुनावणीदरम्यान जस्टिस विक्रम नाथ यांनी वकिलांना विचारलं “आज आमच्यासमोर क्रिकेटशी संबंधित 3-4 प्रकरणं आहेत. एक प्रकरण पुढील टप्प्यासाठी ठेवलेलं आहे, हे दुसरं प्रकरण आहे आणि अजून दोन प्रकरणं आहेत. तुम्ही किती टेस्ट मॅच खेळणार?” यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उत्तर दिलं की देशात क्रिकेटविषयी लोकांमध्ये अफाट वेड आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण
यानंतर न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले, “मला वाटतं आता कोर्टाने क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉलसारख्या खेळांच्या प्रकरणांत हस्तक्षेप करणं थांबवलं पाहिजे.” त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की काही अडचणींमुळेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आणावं लागलं आहे.
‘खेळ आता बिझनेस बनला आहे’
खंडपीठाने पुढे म्हटलं, “या प्रकारच्या प्रकरणांमध्ये अनेकांचे वैयक्तिक आणि आर्थिक हितसंबंध जोडलेले असतात. ज्या खेळात बिझनेसचा हस्तक्षेप होतो, तिथे अशा गोष्टी घडणं अपरिहार्य असतं.” कोर्टाने या याचिकेबाबत स्पष्ट भूमिका घेतली आणि ती स्वीकारण्यात रस नसल्याचं सूचित केलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विनंती करत याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली, जी कोर्टाने मंजूर केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीने एकच गोष्ट स्पष्ट केली आहे की, ‘आजचा क्रिकेट फक्त एक खेळ राहिलेला नाही, तर तो करोडोंचा व्यवसाय बनलेला आहे.’