महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | यंदा दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी ४५० ते ५०० कोटी रुपये खर्च येतो, यात आपण दिवाळीत रेशन दुकानांवर १०० रुपयांत अन्नधान्याचे किट देत होतो. मात्र यावेळी आर्थिक स्थिती पाहता आनंदाचा शिधा देणे शक्य होणार नाही, असे वित्त विभागाने कळवल्याचे भुजबळ यांनी पत्रकाना सांगितले. गणेशोत्सवातही आपण ‘आनंदाचा शिधा’ दिला नव्हता, असेही भुजबळ म्हणाले.
आधीच निधीची ओढाताण, त्यात अतिवृष्टीचे संकट
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर येणाऱ्या आर्थिक ताणाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘या योजनेसाठीचा वर्षाचा खर्च ३५ ते ४० हजार कोटी रुपयांवर जातो. तेवढे पैसे दिल्यामुळे सगळीकडेच त्याचा फटका बसतो.
त्यात अतिवृष्टीमुळे शेतीची हानी झाली आहे. त्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागेल. त्यामुळे ओढाताण निश्चित होणार. काही गोष्टी यावर्षी आपल्याला करता येणार नाहीत.’