महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे अंग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व लडाख केंद्रशासित प्रदेशाकडून उत्तर मागितले आहे. याचिकेत वांगचूक यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तथापि, न्या. अरविंद कुमार व न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने अटकेची कारणे सांगण्याबाबत आदेश देण्यास नकार दिला आणि सुनावणी १४ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.
२६ सप्टेंबर रोजी वांगचूक यांना एनएसए अंतर्गत ताब्यात घेतले. वांगचूक सध्या राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात आहेत. वांगचूक यांच्या पत्नीची
बाजू ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे मांडत आहेत.
रासुका लावण्यावर प्रश्न
वांगचूक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लादण्यावरही याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच्या तरतुदीनुसार विना खटला १२ महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवण्याची परवानगी मिळते.
अटकेत असलेल्या सोनम वांगचूक यांच्या पत्नीने हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची आणि लडाख प्रशासनाला तत्काळ या न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली.
वांगचुक यांच्याशी संपर्क साधण्याची आणि प्रतिबंधात्मक अटकेचा आदेश रद्द करण्याची मागणीदेखील केली आहे.
पत्नीला अटकेची कारणे सांगण्याची गरज नाही?
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावर युक्तिवाद केला की, अटकेत असलेल्या व्यक्तीला (सोनम वांगचूक यांना) त्यांच्या अटकेची कारणे कळवण्यात आली होती. त्यांच्या पत्नीला त्यांच्या अटकेची कारणे सांगण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नाही.