महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची निवड करण्यात आली आहे. मिचेल मार्श एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे या मालिकेचा भाग असणार नाही, याशिवाय ग्लेन मॅक्सवेल याचाही समावेश कोणत्याच संघात करण्यात आलेला नाही.
एकदिवसीय संघात मिचेल स्टार्कचे पुनरागमन झाले आहे. अनुभवी मार्नस लाबुशेनला डच्चू देण्यात आला आहे. तर अनकॅप्ड खेळाडू मॅथ्यू रेनशॉ याला वनडे संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
एकदिवसीय संघात कोण आत, कोण बाहेर?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे होणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी ॲडलेड येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला जाईल.
स्टार्कने नुकताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण त्याची एकदिवसीय संघात वापसी झाली आहे. त्याने अखेरचा एकदिवसीय सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता, त्यानंतर तो वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांतीवर होता. 15 सदस्यीय एकदिवसीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. रेनशॉ, मॅट शॉर्ट आणि मिच ओवेन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ओवेन आणि शॉर्ट दोघांचीही निवड दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी झाली होती, परंतु दुखापतीमुळे ते खेळू शकले नव्हते. आता हे दोन्ही खेळाडू भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत.
ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, ॲलेक्स कॅरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 आंतरराष्ट्रीय संघ (पहिले दोन सामने)
मिचेल मार्श (कर्णधार), सीन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम झम्पा.