महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली जात असून सध्या हवामानात मोठे आणि अनपेक्षित बदल दिसून येत आहे. मान्सूनने राज्यातील काही भागात परतत असताना दुसरीकडे मात्र समुद्रासोबत बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे अनेक जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे दुहेरी संकट येऊन ठेपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून परत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून निघून जाईल असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ञांनी वर्तवला आहे. तसेच ऑक्टोबरहीटच्या झळा वाढणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मान्सून परतायला सुरुवात
राज्यातील काही भागांमधून मान्सून परतीला सुरुवात झाली आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांत मान्सून जाईल असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात शक्ति चक्रीवादळ नाहिस झाले आहे. पुढच्या 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तमिळनाडूकडून पुन्हा संकट राज्याच्या दिशेने येत आहे. त्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे.
पुढील चार दिवसांचं हवामान
पश्चिम बंगालच्या उपसागराच्या वरच्या भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं असून, त्याची टर्फ महाराष्ट्राशेजारील राज्यांपर्यंत पोहोचली आहे. हवामान तज्ज्ञ तृषाणू यांच्या माहितीनुसार, १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान मान्सून महाराष्ट्रातून माघार घेणार असून, त्यानंतर ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.
८ ते १० ऑक्टोबरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
८ आणि ९ ऑक्टोबर: विदर्भ वगळता राज्यातील बहुतेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात: काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.
१० ऑक्टोबर: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम.
उन्हाचा कडाका: ११ ते १२ ऑक्टोबर
या दोन दिवसांत हवामान ढगाळ राहील, मात्र पाऊस जवळपास थांबेल.तापमान वाढेल, ऑक्टोबर हिटचा कडाका जाणवेल, आणि उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहतील. हवामानतज्ज्ञांच्या मते, ला नीना प्रभाव डिसेंबरच्या सुमारास जाणवू शकतो, ज्यामुळे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाची शक्यता
पश्चिम आणि दक्षिणेकडून कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने हवामानात बदल दिसून येत आहेत. हे वारे पुढे सरकले तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट उद्भवू शकतं. आधीच परतीच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि आता अवकाळीचा तडाखा बसल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.