महाराष्ट्राच्या राजकारणात पुढल्या काही तासात मोठा राजकीय भूकंप ? ; लक्ष दिल्लीकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे ठाकरे यांनी दोन वर्षापासून प्रलंबित शिवसेना व धनुष्यबाणाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारा अर्ज केला होता. अनेकदा तारखांमागून तारखा मिळाल्यानंतर पक्षातील फूट पडल्याच्या घटनेला तीन-साडेतीन वर्षांहून अधिक काळ ओलांडल्यावर हा निकाल आज समोर येणार आहे.

पक्ष फुटल्यानंतर काय काय घडलं?
जून 2022 मध्ये, एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले. ते भाजपसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार पाडले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. यामुळे शिवसेना दोन गटांत विभागली गेली. फेब्रुवारी 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने (ईसीआय) पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि चिन्ह ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला दिले. विधानसभेतील बहुमत (शिंदे गटाकडे 40+ आमदार). ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि नवीन चिन्ह ‘मशाल’ मिळाले. ईसीआयने पक्षाच्या घटनेच्या (संविधानाच्या) आधारावर निर्णय घ्यावा, न की विधानसभेतील बहुमतावर, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ठाकरे गटाकडून दोनदा या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी असा अर्ज करुनही तो मान्य करण्यात आला नाही.

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निकालाला महत्त्व
19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. मात्र आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाकडून शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला निकाली काढला जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

त्यांचे कसले मेरीट? ठाकरेंचा सवाल
4 ऑक्टोबर रोजी पुण्यातील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी, “माझा पक्ष, नाव, चिन्ह हे सगळं चोरणाऱ्याचे कसले आले मेरीट? शिवसेना नाव आहे. माझ्या आजोबा, वडिलांनी हे नाव ठेवले आहे. निवडणूक आयोग कोण आहे? त्यांचे काय?” असा सवाल केला होता.

‘लोकशाहीला साजेसा न्याय मिळेल असं वाटतंय’
अंतिम सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडिपीठापुढे होणार आहे, अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. “या आधीच युक्तिवाद आधी पार पडला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे अध्यक्षांनी दिलेल्या निकालनंतर आम्ही एसएलपी लावली होती. सतत तारखा मिळत होत्या. लोकसभा निवडणुका होऊ घातल्या होत्या, आणि त्याआधी निकाल लागावा अशी अपेक्षा होती, पण ते झालं नाही,” असंही अनिल देसाई म्हणाले.

मंगळवारी (7 ऑक्टोबर रोजी) पुढे बोलताना, “विधानसभा निवडणूक झाल्या तरी निर्णय लागला नाही. लोकशाहीची होणारी थट्टा पहात होतो. न्यायची अपेक्षा होती, उद्या निकाल लागेल अशी आशा आहे,” अशी अपेक्षा देसाईंनी व्यक्त केली. “शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेली टीका न्याय प्रक्रियेवर केली होती. अंतिम सुनावणी सुरू आहे त्यामुळे आणखी निकाल पुढे जाणार नाही अशी अपेक्षा आहे. लोकशाहीला साजेसा न्याय मिळेल असं वाटतंय,” असं देसाईंना मत व्यक्त करताना म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *