महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | शहरातील उकाड्यात लक्षणीय वाढ झाली असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि उपनगरांत मंगळवारी (ता. ७) सकाळी ढगाळ वातावरण; तर दुपारी कडक ऊन होते. त्यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी नोंद झालेले २५ अंश सेल्सिअस कमाल तापमान मंगळवारी ३० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले.
किमान तापमानातही किंचित वाढ होऊन २०.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांतही तापमानात मोठी वाढ होऊन ३३ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. ८) आणि गुरुवारी (ता. ९) कमाल तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३१ अंश सेल्सिअस; तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून अति हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी (ता. १०) कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून, ३२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येईल. आकाश अंशतः ढगाळ राहून अति हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.