महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | महाराष्ट्रामध्ये मागील काही काळापासून जातीवरुन सुरु असलेल्या राजकारणाने विरोधाचं टोक गाठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खास करुन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठ्यांना आरक्षण हवेत यासाठी अगदी मुंबईत येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेश सरकारने जारी केल्यापासून भुजबळ आणि जरांगे हा वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसत आहे. एकीकडे जरांगे मराठा समाजाची बाजू मांडत असतानाच दुसरीकडे भुजबळ हे ओबीसींची बाजू मांडताना दिसत आहेत. प्रसारमाध्यमे असो, समर्थकांच्या बैठकी असो किंवा शासकीय स्तरावरील भूमिका असो सगळीकडेच हे दोन्ही गट परस्परांविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. असं असतानाच आता छगन भुजबळांना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनीच सर्वांसमोर सूचक पद्धतीने चार शब्द सुनावले आहेत.
थेट भुजबळांसमोरच…
भुजबळ यांनी आझाद मैदान येथील मराठा जीआर बाबत मांडलेल्या भूमिकेवरून अजित पवार यांनी थेट पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला हजर असलेल्या छगन भुजबळांसमोरच अजित पवारांची थेट नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एनसीपीची आमदरांच्या बैठकीत अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य पाहायला मिळालं. अजित पवारांनी ही विधानं करत थेट भुजबळांच्या विरोधात बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार नक्की काय म्हणाले?
अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांच्या पक्षातील बहुतांश आमदार हजर होते. बैठकीदरम्यान अनेकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडल्यानंतर अजित पवारांनी एका विषयाबद्दल बोलताना थेट जातीय राजकारणावर भाष्य केलं. “काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. त्यांचं हे मत पक्षाची प्रतिमा चूकीची करते,” असं अजित पवार आमदारांसमोरच म्हणाले. तसेच, “पक्षाला याची किंमत मोजावी लागते,” असं सूचक विधान अजित पवारांनी केलं. अजित पवार हे सारं काही बोलत असताना छगन भुजबळ त्यांच्या समोरचं बसले होते. असून आता या पैकी कोणता नेता या पक्षांतर्गत बैठकीतील बाचाबाचीबद्दल प्रसारमाध्यमांशी काय आणि कधी बोलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठ्यांची नाराजी
छगन भुजबळांनी वेळोवेळी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. मनोज जरांगे पाटील असो किंवा शासनाने जारी केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील शासन आदेश असो सर्वच विषयांमध्ये भुजबळांनी आपला विरोध नोंदवताना कठोर शब्दांमध्ये आपली मतं मांडल्याने मराठा समाज दुखावला गेल्याची चर्चा सामाजिक वर्तुळात आहे.