महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संभाजीनगर – दि. ७ सप्टेंबर – दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्याला यंदा वरुणराजांनी मोठा दिलासा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण आता पूर्ण क्षमतेने भरत आले. त्यामुळे धरणातून गेल्या 2 दिवसांपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जायकवाडी धरण भरल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. धरणात पाण्याची आवाक वाढली आहे. त्यामुळे रविवारी रात्रीतून चार दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले आहेत. चार दरवाजे उघडल्यानंतर टप्प्याने आतापर्यंत 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत.या 12 दरवाज्यांमधून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण आता 98 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. सायंकाळपर्यंत अजून काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यामुळे धरणाशेजारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदाकाठच्या नागरिकांनी सावधान राहावे, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे 12 दरवाजे उघडले आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.