महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांमध्ये शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाली आहे. या करारानुसार, हमास सर्व ओलिसांची सुटका करणार असून, त्या बदल्यात इस्रायल आपले सैन्य गाझामधून आंशिक स्वरूपात मागे घेणार आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराची घोषणा करताना याला ‘ऐतिहासिक आणि अभूतपूर्व’ म्हटले आहे. या करारामुळे केवळ ओलिसांची सुटकाच होणार नाही, तर गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले.
करारातील महत्त्वाचे मुद्दे:
ओलिसांची सुटका: हमास आपल्या ताब्यात असलेल्या सर्व ४८ ओलिसांची सुटका करणार आहे.
सैन्याची माघार: इस्रायल आपले सैन्य एका निश्चित रेषेपर्यंत मागे घेईल.
गाझाचा कारभार: हमास गाझाचा कारभार स्वतंत्र पॅलेस्टिनी तंत्रज्ञांच्या गटाकडे सोपवण्यास तयार आहे.
पुढील चर्चा: करारातील इतर मुद्द्यांवर पुढील टप्प्यात चर्चा होणार आहे.
या करारामुळे गाझामधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आता या करारामुळे शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यापूर्वी ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम घडवून आणला होता. गाझावासीय आनंदाने पुन्हा देशात परतू लागले होते. हमासने देखील ओलिसांना सोडण्यास सुरुवात केली होती. परंतू, पुन्हा इस्रायलने हल्ले सुरु केले आणि ट्रम्प तोंडघशी पडले होते. आताही पुन्हा ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. ती किती दिवस टिकेल, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.