महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलंय. याशिवाय अमेरिकेबाहेर निर्माण होणाऱ्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ ट्रम्प यांनी लागू केलंय. या निर्णयाचा फटका देखील भारतीय औषध कंपन्यांना बसणार आहे. अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमावर देखील ट्रम्प यांनी 100 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसाचं शुल्क 1 लाख डॉलर्स केलंय. भारतावर टॅरिफ लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. अमेरिकेतली माजी एनएसए याशिवाय काही अधिकारी भारतासोबतचे संबंध बिघडवल्यानं ट्रम्प यांना जबाबदार धरत आहेत. अमेरिकेचे खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्त्वात 19 खासदारांनी ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे संबंध सुधारण्याचं आवाहन केलंय. याशिवाय खासदारांनी ट्रम्प प्रशासनानं भारतावर वाढवलेलं टॅरिफ देखील मागं घ्यावं अशी मागणी केलीय.
‘भारतासोबतचे संबंध चांगले करा’
अमेरिकेच्या या खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 8 ऑक्टोबरला एक पत्र लिहिलं. अलीकडे वाढवलेल्या टॅरिफमुळं भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्के झालं आहे.यामुळं जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारतासोबत संबंध तणावाचे झाले आहेत. संबंध तणावाचे होणं दोन्ही देशांसाठी नकारात्मक परिणाम समोर आले आहेत. सर्व 19 खासदारांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना महत्त्वाची भागीदारी पुन्हा स्थापित करण्यासाठी आवाहन केलंय.
‘टॅरिफमुळं सप्लाय चेनला नुकसान’
खासदारांनी म्हटलं की ऑगस्ट 2025 च्या अखेरीस ट्रम्प प्रशासनानं भारतीय उत्पादनांवर टॅरिफ वाढवून 50 टक्के केलं आहे. ज्यामध्ये 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ सह रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं भारतीय निर्माते आणि अमेरिकन ग्राहक या दोघांचं नुकसान होत आहे. यामुळं सप्लाय चेनला नुकसान होत आहे. ज्यावर अमेरिकेच्या कंपन्या उत्पादनांना बाजारात आणण्यावर अवलंबून आहेत.
‘भारतावर अमेरिकन निर्माते अवलंबून’
अमेरिकेच्या खासदारांनी व्यापारी भागीदार म्हणून भारताचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. अमेरिकेचे निर्माते सेमीकंडक्टर पासून आरोग्य सेवा, ऊर्जा आणि मुख्य उत्पादनांसाठी भारतावर अवलंबून आहेत. भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. अमेरिकेत भारतीय भारतीय गुंतवणूकदारांनी स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या असं खासदारांनी म्हटलंय.
ट्रम्प यांच्यामुळं भारत चीन आणि रशिया जवळ जाईल
अमेरिकेच्या खासदारांनी अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्यानं भारतासोबतचं संबंध संकटात येऊ शकतात, असं म्हटलं.अमेरिकेतील कुटुंबांचा खर्च वाढू शकतो. अमेरिकेच्या कंपन्यांची जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता कमी होऊ शकते. ट्रम्प प्रशासनानं टॅरिफ लादल्यानं भारत रशिया आणि चीन जवळ येऊ शकतात अशी भीती खासदारांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या खासदारांनी क्वाडचा देखील उल्लेख केला.