महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोडींची समस्या सोडविण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात आली आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाकण औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध रस्ते प्रकल्पांना गती दिली आहे. या प्रकल्पांच्या स्वीकृत निविदांची छाननी सुरू आहे. सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी ४०.७४ किलोमीटर असून, त्यांचा अंदाजे खर्च ५५८.१२ कोटी रुपये आहे. ही सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली आहेत.
खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून १९६.५० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यात धामणे फाटा ते जि.प. शाळा-कोये या २ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ८ कोटी, कोहिंडे फाटा ते कडूस गावठाणपर्यंतच्या ५.६० किलोमीटरच्या रस्त्यासाठी २० कोटी, कडूस गावठाण ते किवळे या ५.५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी २० कोटी, भोसे रा.मा.५५ ते वडगाव घेनंद या १.२० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ कोटी, किवळे ते आंबेठाण या ०.८९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी३.५० कोटी आणि देहू येलवाडी या २.५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १०४ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्यांची एकूण लांबी १७.६९ किलोमीटर आहे.
खेड तालुक्यातील मुख्य चाकण चौकातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. या कामासाठी १००.१४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्राधिकरणामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मौजे चिखली ते मोई या १.७० किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३.४२ कोटी, कुरुळी फाटा ते निघोजे या २.५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी १५.५० कोटी, पुणे-नाशिक रस्त्यावर आळंदी फाटा (चाकण) ते आंळदी रस्ता या ४ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २० कोटी, पुणे-नाशिक रस्त्यावर आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता या ४ किलोमीटरच्या रस्त्यासाठी २० कोटी, चऱ्होली खु. ते आळंदी, मरकळ रस्ता या २ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १२ कोटी, निघोजे ते चाकण एमआयडीसी या १.५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ६.७२ कोटी, खालुब्रे ते एमआयडीसी टप्पा दोन या २ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १२.५० कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांची एकूण लांबी १७.७० किलोमीटर आहे.