महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पहाटे भीषण अपघात झाला. मोगरा मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. चालकाचे पोर्शे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकली. या अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये महागड्या पोर्शे कारचा चुराडा झाला. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पोर्शे कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती महामार्गावर पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. दोन कारचालकांमध्ये रेस लागली होती. ही रेसच भीषण अपघाताचे कारण ठरली. मोगरा मेट्रो स्थानकाजवळ पोर्शे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती अपघातग्रस्त झाली. या अपघातात निळ्या रंगाच्या पोर्शे कारचा चुराडा झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या भयंकर अपघातामध्ये कार चालक तरुण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. कार चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पोर्शे कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारला मोठा अपघात झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दोन्ही कारमध्ये रेस लागली होती. बोरिवलीकडून अंधेरीचे दिशेने येणारा मार्गावर ही रेस लागली होती. भरधाव वेगाने कार चालवत असल्यामुळे चालकाचे कारवरीन नियंत्रण सुटले आणि या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या अपघातात कार हायवेवर ४ ते ५ वेळा पलटी झाली. या अपघातात कारचा चुराडा झाला. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अपघात झाला. काम सुरू असताना तीन कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. यामधील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास जोगेश्वरी पोलिस करत आहेत.