महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आमदार पाटील समर्थकांनी सांगलीत जाहीर सभा घेऊन गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, आता जयंत पाटील यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर या शहरातील एका कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांची विशेष मुलाखत होती. यावेळी पाटील यांना आमदार पडळकर यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता फटकारले.
जयंत पाटील यांची टीका काय?
ईश्वरपूरमधील एका विशेष मुलाखमतीमध्ये आमदार जयंत पाटील यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता फटकारले. “गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका याआधी कधी तुमच्या ४० वर्षाच्या राजकारणात केली नव्हती. तुमच्या आई -वडिलांबद्दल केलेल्या टीकेवर तुम्ही काहीच रिअॅक्ट झाला नाहीत. तुमची काय भावना आहे?’, असा प्रश्न मुलाखतीमध्ये आमदार पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘क्या बड़ा तो सबसे दम बड़ा,मागे मी एकदा कुठेतरी सांगितले होते की, आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गावही नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही”, असं प्रत्युत्तर जयंत पाटील दिले.
“जाऊ दे वेळ येईल, आम्ही सगळे वाळवे तालुक्यातील लोक फार हुशार, दमदार आहेत. काळ वेळ बघू.आपला असेल तर त्याला समजावून सांगायचं, विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं. जो आपला नाही त्याला आपण सुधरवण्याचा प्रयत्न कशाला करायचा”, असंही जयंत पाटील म्हणाले.