महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | शहरातील उकाड्यात लक्षणीय वाढ झाली असून, शहर आणि उपनगर परिसरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहरातील लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात शुक्रवारी (ता. १०) सर्वात जास्त ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर शिवाजीनगर ३२.८, मगरपट्टा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले.
पुढील तीन ते चार दिवसांत शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. तसेच, किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली. शङरात शनिवारी (ता. ११) कमाल तापमान स्थिर राहणार असून, ३२ अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.