महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर | घायवळ गँगच्या दहा सदस्यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या गॅंगचा मोऱ्हक्या निलेश घायवळला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशातच आता त्याच्या विरोधात इंटरपोलकडून ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी इंटरपोलला लिहिलेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे
कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोधदेखील पुणे पोलीस घेत आहेत. पण तो विदेशात पळून गेला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिल आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याचा शोध आता इंटरपोलकडून घेतला जाणार आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.
यापूर्वी पुणे पोलिसांनी घायवळच्या कोथरुड येथील घरावर छापेमारी केली आहे. यावेळी त्याच्या घरातून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याठिकाणी पोलिसांना दोन जिवंत काडतूसदेखील सापडली आहेत. तसेच अनेक जमिनींची अनाधिकृत कागदपत्रदेखील पोलिसांनी जप्त केली आहेत. निलेश घायवळला चारही बाजुंनी घेरण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून सुरु आहे.