महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप कायम आहे. पावसाला पोषक वातावरण असून आज नागरिकांना उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ओसरला असून, या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काल सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंश होता तर, दुपारच्या वेळी उन्हाचा प्रकाश तीव्र होता.
काल म्हणजेच रविवारी पहाटे पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरसह मुंबईतील सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज मुख्यतः उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मॉन्सूनने शुक्रवारी १० ऑकटोबर रोजी संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून काढता पाय घेतला आहे. अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत मॉन्सूनच्या परतीची सिमा रविवारी कायम होती. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.