महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | महिला लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या eKYC प्रक्रियेत एक नवी अडचण समोर आली आहे. अनेक विवाहित तसेच विधवा महिलांना, पती किंवा वडील हयात नसल्यामुळे प्रमाणीकरण करताना प्रणाली ‘फेल’ दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या नावावरची शासकीय योजना थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“ज्यांच्या नावावर योजना आहे, त्यांनाच प्रमाणीकरण करता येतं… मग आम्ही कोणाकडे जावं?” — असा सवाल अनेक महिलांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात तर या प्रक्रियेबाबत अधिक संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाले आहेत.
माहितीनुसार, आधार आधारित ओळख पडताळणी (eKYC) करताना संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील नातेसंबंधावर प्रणाली अवलंबून असते. मात्र पती किंवा वडील निधन पावले असतील, आणि त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र अद्ययावत नसेल, तर प्रक्रिया अडते. त्यामुळे अनेक विधवा किंवा अनाथ महिलांना त्रास होत आहे.
दरम्यान, सरकारने या समस्येची दखल घेतली असून ‘विशेष सवलत व्यवस्था’ तयार करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. अशी अपेक्षा आहे की, महिला व अनाथ लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रमाणीकरण पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
“कोणी तरी ऐकावं, आणि या अडचणीला उपाय मिळावा, हीच अपेक्षा!” — अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, हा हप्ता उशिराने जमा झाला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत.