महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल-हमासमध्ये संघर्ष सुरू होता. हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत शांतता निर्माण व्हावी, यासाठी २० कलमी कार्यक्रम तयार करत हा प्रस्ताव स्वीकारण्याचं इस्रायल आणि हमासला आवाहन केलं होतं. या युद्धविरामाच्या कराराला इस्रायल आणि हमासने सहमती दर्शवल्यानंतर या कराराचाच एक भाग म्हणून ओलिसांची मुक्तता करण्यात येत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या घडामोडींबाबत बोलताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘गाझा युद्ध संपलं आहे’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. दरम्यान, ट्रम्प हे इस्रायलच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धबंदी झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
इस्रायल-हमासमधील युद्ध संपलं आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला असता ट्रम्प यांनी म्हटलं की, “युद्ध संपलं आहे, हे तुम्हाला समजलच असेल.” तसेच इस्रायल-हमासमधील युद्धबंदीचा करार टिकेल असं वाटतं का? यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “मला वाटतं की तो टिकेल. तो टिकण्याची अनेक कारणे आहेत. लोकांना आता त्याचा (युद्धाचा) कंटाळा आला आहे.”
दरम्यान, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि कतारचं कौतुक केलं आहे. ट्रम्प म्हणाले की, इस्रायल-हमास युद्धबंदीमध्ये मध्यस्थी करण्यास मदत केल्याबद्दल कतारला श्रेय मिळायलाच हवं. तसेच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. तसेच ट्रम्प यांनी म्हटलं की, “काही ओलिसांना अपेक्षेपेक्षा लवकर सोडलं जाऊ शकतं आणि गाझाच्या पुनर्बांधणीवर देखरेख करण्यासाठी लवकरच शांतता समिती स्थापन केली जाईल.”
युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा कसा काम करेल?
इस्रायलच्या सरकारी प्रेस ऑफिसने रविवारी ३३ ओलिसांच्या नावांची पुष्टी केली, ज्यापैकी ३१ जणांचे ७ ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले होते. इतर दोघांना २०१४ आणि २०१५ पासून बंदिस्त करण्यात आले होते. सुटका होणाऱ्यांमध्ये हमासच्या ताब्यात असलेल्या दोन सर्वांत लहान बंधकांचाही समावेश आहे. रविवारी सुटका करण्यात आलेल्या तीन इस्रायली महिलांचा समावेश आहे. त्या बदल्यात इस्रायलने जवळपास २,००० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे अपेक्षित आहे. रविवारी सुमारे ९० इस्रायलींना तुरुंगातून सोडण्यात आले. इस्रायली सरकारने ७३७ पॅलेस्टिनी कैदी व बंदिवान आणि १,१६७ गाझा रहिवाशांच्या सुटकेसही मान्यता दिली आहे.