Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी : लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातील अनेक शहरांमध्ये रेल्वेची सेवा पोहोचलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. खरं तर रेल्वेचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास म्हणून याकडे पाहिलं जातं. लाखो प्रवासी दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात रेल्वेने प्रवास करत असतात.

या पार्श्वभूमीवरच लोकांच्या सेवेसाठी रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेसच्या वातानुकूलीत गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर आता रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच वंदे भारत वातानुकूलीत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, इंडो – रशियन जॉइंट व्हेंचर किनेट रेल्वे सोल्युशन्स पुढील आठवड्यात त्यांच्या पहिल्या एसी कोचच्या डिझाइनचं अनावरण करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही किनेट रेल्वे सोल्युशन्सद्वारे तयार करण्यात येत आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या डब्याचं दिल्लीत होणार अनावरण
वृत्तानुसार, किनेट रेल्वे सोल्युशन्स पुढील आठवड्यात दिल्लीच्या भारत मंडपम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे इक्विपमेंट एग्झिबिशनमध्ये (IREE) २०२५ प्रदर्शित केलं जाईल आणि त्यानंतर पहिल्या एसी डब्याच्या डिझाइनच्या संकल्पनेचं अनावरण करणार आहे.

दरम्यान, ही कंपनी भारतीय रेल्वेसाठी १२० वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी आघाडीच्या रशियन रोलिंग स्टॉक कंपन्या आणि रेव्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) यांचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय वाहतूक कंपनीने वंदे भारत स्लीपर ट्रेन्सचे उत्पादन करण्याचे कंत्राट तीन कंपन्यांना दिले आहे. तसेच रेल्वेने दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं होतं की, दुसरी ट्रेन नियमित सेवेसाठी पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ही लॉन्च होईल. ही ट्रेन बीईएमएलने आयसीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. तसेच दुसरी ट्रेन तयार केली जात आहे आणि ती १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *