महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या ‘लाईफलाईन’वरच संकट ओढवलं आहे! राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि देयके तब्बल ४,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. 2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून , न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे — आणि आता सणासुदीच्या काळातच ‘बस’ ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे!
मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर
एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून आंदोलनाची नोटीस दिली आहे. आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होत आहे. यासंदर्भात रविवारी कृती समिती मधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समिती मधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण जीवनावर परिणाम
शहरांमध्ये एसटी बसचा मोठ्या प्रमाणात वापरत होत नसला तरी आजही गावागावात पोहोचणारी एकमेव सार्वजनिक सेवा म्हणून एसटीकडे पाहिलं जातं. ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार एसटीवर अवलंबून असतात. त्यातच सणासुदीला सामानासाठी, खरेदीसाठी किंवा इतर कामांसाठी जिल्हा, तालुक्याच्या गावी जाण्यासाठी एसटीचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशावेळी एसटी बंद झाली तर सर्वसामान्यांचे हाल होतील.
मागण्या काय?
2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने मशाल मोर्चा व ठिय्या आंदोलनाची वेगळी नोटीस दिली होती. पण आर्थिक मागण्यांचे स्वरूप सारखेच असल्याने सदरची नोटीस मागे घेण्यात आली असून कृती समितीच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.