महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | भारतातून परदेशातही फराळाला माेठी मागणी असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे त्याचा फटका फराळ व्यवसायालाही बसत आहे. भारतातून अमेरिकेत तीन किलो फराळ मागवण्यासाठी कुरियर आणि जीएसटीसह ७,५०० रुपये मोजावे लागतात. त्यावर आणखी ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागणार असल्याने हा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे फराळाच्या ऑर्डर घटल्याचे दिसून येते. यंदा त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी फराळाची दुकाने तसेच बचत गटांचे स्टॉल सजले आहेत.
महागाईमुळे यंदा फराळाच्या किमतीही १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहेत. त्यातच ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेत मागवल्या जाणाऱ्या फराळाच्या ऑर्डर घटल्या आहेत. ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. साखर, रवा, बेसन, कच्चा चिवडा, बेसन, मैदा आदी वस्तू घरी नेऊन फराळ बनवण्याऐवजी नोकरदारांकडून तयार फराळ खरेदीवर भर दिला जात आहे; मात्र महागाईमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
या फराळाला मागणी
ग्राहकांकडून तयार फराळामध्ये कमी साखरेच्या आणि तिखट पदार्थांना पसंती मिळत आहे. तिखट शेव, चिवडा, चकली, लसूण शेव, कोन बाकरवडी आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. तेलकट फराळाच्या खरेदीबाबतही ग्राहक विचार करीत असल्याचे जाईजुई महिला बचत गटाच्या चालक सविता कचरे यांनी सांगितले.
तयार फराळाच्या किमती (प्रति किलो)
करंजी ८८० रुपये
बेसन लाडू ९६० रुपये
भाजणी चकली ५२०-६०० रुपये
शंकरपाळी ४००- ४६० रुपये
काजी चिवडा ४४० रुपये
मका चिवडा ३२० रुपये
बटाटा चिवडा ४६० रुपये
तिखट शेव ४०० रुपये
लसूण शेव ४०० रुपये
बाकरवडी ४२० रुपये
काजू पतीसा ५२० रुपये
फराळ पाठवण्याचा दर (तीन किलो)
अमेरिका ७,५०० रु.
इंग्लंड, सिंगापूर, दुबई ४,८०० रु.
ऑस्ट्रेलियन, कॅनडा, कोरिया ८,५०० रु.
भारतात कुठेही ३,२००