महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सहा हजार रूपयांचा बोनस दिला जाणार आहे. यासोबतच सरकार आणखी महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याशिवाय वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देण्यात येणार आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाला दर महिन्याला 65 कोटी रुपये देणार आहे. हे पैसे सलग चार वर्षे राज्य सरकारकडून देण्यात येतील.
एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकार्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय वेतन वाढीचा फरक वेतनासोबतच देण्यासाठीही निर्णय घेतलाय. महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केला.
एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतना सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
विरार पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 22 हजारच्या दिवाळी बोनस
वसई विरार शहर महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या सणांच्या मुहूर्तावर 3 हजार 640 कर्मचाऱ्यांना 22 हजाराचा बोनस देण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेतील कायम स्वरुपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे 8 कोटी 8 लाखांचा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.