महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कृत्तिका नक्षत्रापासून सुरू झालेल्या पावसाने राज्यात उसंत घेतली आहे. असे असले तरी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाचा चटका कायम असताना आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी उन्हाची झळ कायम राहणार आहे.
बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांपार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ, जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी, अमरावती येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची परतीची वाटचाल अंतिम टप्प्यावर आली आहे. सोमवारी बहुतांशी महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. तर मंगळवारी संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागातून मॉन्सून माघारी फिरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी सकाळच्या प्रहरी थंडीची चाहूल लागली आहे.