कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | भारतात बनविलेली खोकल्यावरील कोल्डरिफ, रेस्पीफ्रेश टीआर, रिलाईफ ही तीन सिरप निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोल्डरिफ हे सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशातील २२ मुलांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर ही सावधगिरी बाळगण्यात येत आहे.

या सिरपचा साठा आढळल्यास किंंवा त्यांच्या वापरामुळे विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास केंद्राने त्याचा अहवाल सादर करावा असे संघटनेने म्हटले आहे. सर्दी, फ्लू, खोकल्याची लक्षणे कमी करण्यासाठी ही सिरप वापरली जातात. भारतात बनविलेल्या तीन सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल या विषारी घटकाचे अस्तित्व होते. भारतामध्ये लहान मुलांना गंभीर आजार झाला असून त्यांचे मृत्यू होत असल्याची माहिती संघटनेला त्याआधीच मिळाली होती. कोल्डरिफ, रेस्पीफ्रेश टीआर, रिलाईफच्या विशिष्ट बॅचमध्ये विषारी सिरप असल्याचे आढळले होते.

व्यावसायिकांना दिला हा सल्ला
विषारी सिरप आढळल्यास किंवा त्यामुळे काही घटना घडल्याचे दिसताच संबंधित देशातील औषध नियामक संस्था किंवा राष्ट्रीय औषध निरीक्षण केंद्राशी संपर्क साधा. बेकायदेशीरपणे अनेक औषधे विकली जातात. त्यात हे विषारी सिरप आढळल्यास सावध राहा ही सिरप वापरणे टाळा.

भारताबाहेर विक्री नाही
विषारी सिरपचे उत्पादन थांबविले असून त्या कंपन्यांचे उत्पादन परवाने स्थगित केलेत. निकृष्ट दर्जाच्या सिरपचे साठे परत मागविण्यात आले आहेत. या सिरपची भारताबाहेर अधिकृतरीत्या कुठेही निर्यात झालेली नाही, असे सीडीएससीओने म्हटले आहे.

हे उत्पादन निकृष्ट का मानले जाते?
सिरपमधील डायइथिलीन ग्लायकॉल हा घटक विषारी आहे. त्याचा वापर प्राणघातक ठरू शकतो.
या घटकाचा वापर केलेले सिरप घेतल्याने लहान मुलांना गंभीर इजा किंवा मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो.
त्याने विषबाधा झाल्यास पोटदुखी, उलटी, अतिसार, लघवी होण्यात अडचण, डोकेदुखी, मानसिक स्थितीत बदल, मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे दिसतात.

कफ सिरप, वेदनाशामक गोळ्यांचा मोठा साठा जप्त
उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये कोडिनयुक्त कफ सिरप आणि वेदनाशामक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत काही लाख रुपये आहे. या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. छाप्यादरम्यान “एमएलए” स्टिकर लावलेली आणि सचिवालय पास असलेली एक आलिशान कारसुद्धा तपासण्यात आली. त्या कारमध्येही औषधांचा साठा आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *